मराठी बृहद्कोश

आठ मराठी शब्दकोशांतील २,६०,८६३ शब्दांचा एकत्रित संग्रह! 

शब्दार्थ

अरुवार

वि. १ कोमल; नाजुक; मृदु; सुंदर; मऊ; हळु- वार; सुकुमार. ‘कीं अरुवरें करें । विचित्रा धातुचीं सपुरें ।’ -ऋ ७८. ‘कां अन्न लाभें अरुवारें । रांधितीये उणें’ –ज्ञा १८. १४२. ‘रातोत्पलसुकुमार । त्याहूनि पदें तुमचीं अरुवार ।’ -रावि १३.५९. ‘कीं कमळिणी सुकुमार....कीं शिरस फूल अरुवार । क्षणमात्नें कुचुंबे ।’ –हरि २.१३५. २ खुसखुशीत; हलकी; हळु. ‘एक सच्छिद्रें अरुवार । नवनीतसङ्गें गोडसीं ।’ –मुआदि २९.८४. ३ हलकें. ‘वाळल्या अनुतापकाचरिया । वैराग्य-तळणें अरुवारिया ।’ -एरुस्व १४.१०८. [हळुवार. का. अरळु = फूल]. –न. मृदुशय्या. ‘महा सुखाचे अरुवारीं ।’ –परमा १२.७. ‘तो असे क्षीरसागरीं । निद्रिस्त शेषाचे अरुवारीं ।’ –कथा २.५.१५७. अरवार पहा.

दाते शब्दकोश

अरुवार      

वि.       १. कोमल; नाजूक; मृदू; सुंदर; मऊ; हळुवार; सुकुमार : ‘रातोत्पल सुकुमार । त्याहूनि पदें तुमची अरुवार ।’ – रावि १३·५९. २. खुसखुशीत, हलकी; हळू : ‘एक सच्छिद्रें अरुवार नवनीतसड्‌गे गोडसी ।’ – मुआदि २९·८४. ३. हलकें : ‘वाळल्या अनुतापकाचरिया । वैराग्य – तळणे अरुवारिया ।’ – एरुस्व १४·१०८. न. मृदुशय्या : ‘तो असे क्षीरसागरी । निद्रिस्त शेषाचे अरुवारी ।’ – कथा २·५·१५७. पहा : अरवार [क. अडे]

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

अरुवार or ळ

अरुवार or ळ aruvāra or ḷa a (Poetry.) Commonly अरवार.

मोल्सवर्थ शब्दकोश

संबंधित शब्द

अरवार-ळ

वि. अरुवार पहा. १ हलकें; सहज तुकडे पडणारी (भाकरी, पोळी इ. ); खुसखूशित (पक्कान). २ मऊ; नरम (आंबे, केळीं, इ.) 'मुळे चांगले अरवार असतात' -बागेची माहिती. ३४. ३ (काव्य) नाजुक, सुकुमार. -स्त्री. मृदू शय्या, शेज; अरुवार पहा. [का. अरलु = फुल ? ते. अरवरलु = काटकुळा, पातळ.]

दाते शब्दकोश

अळुवार

वि. हळुवार पहा. अरुवार पहा. १ नाजूक. २ हळव्या मनाचा.

दाते शब्दकोश

अरळ

न. १ फुल. 'शेजेवरी अरळ सुकलें.' -ह ३०.२७. २ (गो.) मऊ झालेलें. -क्रिवि. (अल्लाद या अर्थी ) 'उंच होवोनि ऊर्ध्व हस्तें । अरळ कळिका तोडिल्या' -ह. १७.१०९. [का. अरळु = फुलणें; फुल] -वि. (ल.) नाजूक, मृदू. 'शय्या घालुनी एकांती । अरळ सुमनांची निगुति ।' -एरुस्व ३.२६ अरवार; अरुवार, अरु- वाळ, पहा.

दाते शब्दकोश

आरळ

वि. नाजुक; अरुवार; मृदु. अरळ पहा. 'कवणाचिये सेजे फुलांचे आरळ घालिजे ।' -भाए १३०. 'मागें बुचडा आरळ झोक माथ्यावर पदराचा । चार आंगुळें सरळ लपविला चंद्र तार- फेचा ।' -होला १००.

दाते शब्दकोश

आरळ      

वि.       १. नाजूक; अरुवार, मृदू; २. सैल; विस्कळीत; ढिले : ‘कवणाचिये सेजे फुलांचे आरळ घालिजे ।’ − भाए १३०.

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

अरवा

वि. नाजूक; अरवार; अरुवार पहा. 'माशुक मउ मुखचंद्र सकुमार पुष्पाहुनचि अरवां।' -प्रला २३०.

दाते शब्दकोश

अरवाल

वि. हळूवार; हलका. अरुवार पहा. ‘त्यजिला सहदेवावरि अरिहननीं जो उदंड अरवाल ।’ -मोकर्ण १४.२६.

दाते शब्दकोश

अरवार or ळ

अरवार or ळ aravāra or ḷa a Light, rich and soft, crumbling, friable--cakes &c. 2 Light, soft, not tough or clammy or sticky--mangoes, plantains &c. 3 (Esp. in poetry.) Soft and delicate: as तुमचिं पदें अरुवार ॥ 4 P Mischievous, frolicsome, prankish, rantipole, roving, truant;--esp. a child.

मोल्सवर्थ शब्दकोश

चादर      

स्त्री.       १. पलंगपोस; कापडी आच्छादन; बैठकीचे वस्त्र : ‘भीमकें केला बैसकार । चादरिया घातल्या अरुवार ।’ – कथा १·८·१४८.२. धबधब्याचे पाणी पडत असताना दिसणारा सरळ पसरट ओघ. पहा : चद्दर (झाडी) [फा. चद्दर]

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

चादर, चादरी

स्त्री. (हिं.) १ पलंगपोस; वस्त्राचें आच्छादन. बैठकीचें वस्त्र. 'भीमकें केला बैसकार । चादरिया घातल्या अरुवार ।' -कथा १.८.१४८. २ धबधब्याचें पाणी खालीं पडत असतांना दिसणारा देखावा? [चद्दर पहा.]

दाते शब्दकोश

दळवाड, दळवाडा, दळवाडे      

पु.       १. समुदाय; सैन्य; गर्दी; जमाव : ‘ढांडोळितां उपमेचें दळवाडें ।’ - ऋ ३८. २. खांब : ‘अरुवार घडले दळवाडें कापुरकेळीचें - शिव ७६२.

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

हळ(ळु)वार

वि. १ अरुवार; नाजूक; कोमल; फार श्रम सोसण्यास असमर्थ; हलका; मृदु. २ हलका; खुपखुशीत; उंची; श्रीमंती (कणीक, तूप इ॰ चें पदार्थ, पक्वान्न). -क्रिवि. नाजूक- पणें. ॰णें-अक्रि. नाजूक होणें; हलक होणें. 'जें यमदमीं हळु- वारलें । आज्ञतें होतें ।' -ज्ञा ४.१३५. ॰पण-न. हलकेपणा; सूक्ष्मपणा. 'अति हळुवारपण चित्ता । आणुनियां ।' -ज्ञा १.५७; ६.२६. ? [हळू + वार]

दाते शब्दकोश

हळु-ळू

वि. १ हलका; अजड. २ हल्लक; मोकळें. 'डोळे काढले कपाळ हळू झालें.' ३ (इतर अर्थीं) हलका पहा. [सं. लघु = लहू-हळु] हळु-ळू, हळूहळू, हळूच-कण- कन-कर-दिशी-१ सावकाश; हलकेंच; आस्ते; मंदगतीनें. २ सहज; सौम्यतेनें (बोलणें, चालणें, हलणें, वागणें). म्ह॰ (व.) हळु बोल्या गोंधळ घाल्या हळूच चुगली खाऊन कलागत लावणारा. हळुमळ-माळ-वार-वि. नाजूक; मऊ; कोमल (व्यक्ति, प्रकृति, फूल झाड इ॰). अरुवार पहा. हळुवट- वि. १ (काव्य) साधारण हलकें, मऊ, नाजूक, सौम्य. 'उपमे तुळितां निर्जर नगर । चढे हळुवट आकाशीं ।' २ क्षुद्र; क्षुल्लक; तिरस्करणीय. ३ हळवट पहा. ४ लहान; लघु. 'श्री. गुरु ते वस्तु घनवट । लघुते बोलिजे हळुवट ।' ५ उणें; न्यून. ॰वाय-क्रिवि. (गो.) हळुहळू. हळुवें-वि. हलकें.

दाते शब्दकोश

हळवार

हळवार haḷavāra a (Or अरुवार) Light, soft, rich and friable;--used of certain preparations of flour and clarified butter.

मोल्सवर्थ शब्दकोश

हरवार-ळ

वि. अरुवार; हलकें व मऊ; मोखर (अनरसा इ॰ पक्वान्न). हळवार पहा.

दाते शब्दकोश

हुलुसवार

वि. नाजूक; अरुवार (प्रकृति, वस्तु).

दाते शब्दकोश

कुचुंबणे      

अक्रि.       कोमजणे : ‘कीं शिरसफूल अरुवार क्षणमात्रें कुचुंबी ।’ - हरि २. १३५. [सं. कुच = संकोच पावणे]

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

कुचुंबणें

अक्रि. कोमेजणें. 'कीं शिरसफूल अरुवार क्षण- मात्रें कुचंबी ।' -ह २. १३५.[सं. कुच् = संकोच पावणें]

दाते शब्दकोश

नाबद-चूर्ण

(न.) पिठीसाखर. “अरुवार सोजिया फेणिया । नाबद-चूर्णे कोंदलिया” (मुक्तेश्वर-विराटपर्व ८|७१).

फारसी-मराठी शब्दकोश

नाबद-दी, नाबाद साखर

स्त्री. खडी साखर; 'व्यास- वचन इक्षुदंडु । गाळुनि सुरस सारांश गोडु । देशभाषा वळिले लाडु । नाबदेचे आवडी ।' -मुसभा १.१९. 'गोड अत्यंत नाबदी साखर । मुखीं घालितां कडकड फार ।' -रावि २२.७८. नाबदचूर्ण-न. पिठीसाखर; 'अरुवार सोजिया फेणिया । नाबदचूर्णें कोंदलिया ।' -मुविराट ८.७१. नाबदार-पु. खडीसाखरेचा ढीग. -शर.

दाते शब्दकोश

पालाणणें

जोडणें; सज्ज करणें. “पालाणिले रथकुञ्जर” (मुक्तेश्वर-आदिपर्व २९|६५). “पालाणारे सकल सैन्य” (मुक्तेश्वर-आदिपर्व ४७|१११). “रत्नमणींचीं बाळलेणीं । पालाणिलीं अरुवार” (मुक्तेश्वर-सभापर्व ४|१७).

फारसी-मराठी शब्दकोश

थरथरीत

वि. (महानु.) थलथलीत; हालणारें. 'तैसें अगाध दोंद अरुवार थरथरीत.' -नरुस्व १११६.

दाते शब्दकोश