मराठी बृहद्कोश

आठ मराठी शब्दकोशांतील २,६०,८६३ शब्दांचा एकत्रित संग्रह! 

शब्दार्थ

इस्तरी इस्त्री

स्त्री. धुतलेला कपडा ओलसर असतांना त्याच्यावरील सुरकुत्या जाऊन त्यास कडकपणा येण्यासाठीं त्यावर (ज्यांत विस्तव आहे असें) फिरवावयाचें यंत्र. यानें कपडा झगझगीत होतो. या यंत्राचे पोकळ व भरींव असे दोन प्रकार आहेत; अग्निपात्र; कुंदी करण्याचें यंत्र. ॰करणें-मारणें-इस्त्री करणें; अग्निपात्रानें कपडा सफाईदार करणें. 'या कोटास इस्त्री करून द्या.' [हि. इस्तु = विस्तव + आर-आरी; म. विस्तव]

दाते शब्दकोश

इस्तरी, इस्त्री      

स्त्री.       बाई; बायको. पहा : अस्तुरी : ‘मी बी पुरुसराज्यांतून इस्तरीराज्यावर एकदम हापटलों.’ − बाय २.

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

स्त्री.       १. धुतलेल्या कपड्यांच्या सुरकुत्या काढून त्यास कडकपणा येण्यासाठी त्यावर फिरवण्याचे उपकरण. २. कुंदी करण्याचे यंत्र; एक विद्युत उपकरण. (क्रि. करणे, मारणे).

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

इस्तरी, इस्त्री

स्त्री. स्त्री; बायको; बाई; अस्तुरी पहा. 'मी बी पुरुसराज्यांतून इस्तीरिराज्यावर एकदम हापटलों' -बाय २.२.[स्त्री अप.]

दाते शब्दकोश

इस्त्री

इस्त्री f Ironing; a smoothing iron.

वझे शब्दकोश

(सं) पु० इस्तरी, खळ लावून आणलेली सफाई. २ कपडे साफ करण्याचें हत्यार.

शुद्ध मराठी कोश (बापट पंडित)

इस्त्री istrī f (स्त्री S through H) A smoothing iron. 2 Ironing.

मोल्सवर्थ शब्दकोश

स्त्री. कोळपें दाबून धरण्याची काठी. -चित्रकृषि २.६.

दाते शब्दकोश

इस्त्री      

स्त्री.       कोळपे दाबून धरण्याची काठी.

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

संबंधित शब्द

अहार      

पु.       १. विस्तव; निखारा; फुफाटा. २. इस्त्री. (वा.) अहार देणे– इस्त्री करणे.

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

कच्ची कुंदी      

१. कपडा भट्टीत न घालता नुसता धुऊन केलेली थंडी इस्त्री. २. धुतलेल्या कपड्यांना खळ न लावता केलेली इस्त्री. कच्ची कैद      

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

कच्चा

वि. १ न पिकलेला; हिरवा; कोंवळा (फळ, गळूं, पान इ॰). २ साफसूफ न केलेला; ओबडधोबड (दगड, चित्र, इ॰). ३ अशिजा (भात, भाकरी, रसायन इ॰). ४ अपुरा व पक्का न केलेला; सरासरीचा; ठोकळ (जमाखर्च, काम, इ॰). ५ अपूर्ण; अपक्व; अप्रौढ (कट, मसलत इ॰). ६ अपुरें समजलेलें किंवा मिळविलेलें (शास्त्र, कला). ७ अपुर्‍या ज्ञानाचा; अर्धवट शिक्ष- णाचा (माणूस). 'तो अभ्यासांत कच्चा आहे.' ८ बिन वाकब- गार; अडाणी; संस्कारहीन; यथातथा ज्ञान असलेला. ९ कोता; अप्रौढ; संकुचित (विचार, बुद्धि). १० गौण; लहान; कमी (वजन, माप; इ॰). ११ न टिकणारा; लवकर नाहींसा होणारा (रंग इ॰). १२ सविस्तर; सर्व पोटभेद ज्यामध्यें घेतले आहेत असा (हिशेब). १३ बळकट नाहीं असा (बांधकाम इ॰). 'मातींत घर बांधूं नये, मातीचें काम अगदीं कच्चें असतें.' १४ इयत्तेहून, वाजवी- पेक्षां कमी. 'आम्हीं एका तासांत एक कच्चा कोस चालतों.' १५ कढवून फार घट्ट न केलेला (साखरेचा पाक इ॰). १६ (गणित) त्रैराशिकांतील दुसरें व तिसरें या दोन पदांचा गुणाकार करून येणार्‍या रकमेस कच्चे म्हणतात. नंतर त्यांस प्रथमपदानें भागून आलेल्या भागाकारास पक्के किंवा पक्का म्हणतात (ज्याच्या- मध्यें भारी परिमाणाच्या किंमतीवरून हलक्या परिमाणाची किंमत काढावयाची असते अशा हिशेबांत उपयोग), उ॰ १० शेरांस पांच रुपये, तर १।। पावशेरास किती. येथें ५ व १।। ह्यांचा गुणाकार जो ७ ।। कच्चे. १७ कामामध्यें तोटानफा होईल तो मूळ धन्याचा अशा बोलीनें केलेली (नोकरी, मामलत, इ॰); पगारी (मक्ता न देतां नोकराकडून प्रत्यक्षपणें सारा वगैरे वसूल करण्याच्या पद्धतीला हा शब्द लावितात). कच्चा हा शब्द अपुरा, ओबड- धोबड, अप्रौढ, उणा ह्या अर्थानें शब्दशः व लाक्षणिकरीत्या अनेक प्रकारें योजतात. उ॰ कच्चा मजकूर-लिहिणें-वर्तमान-बातमी-हकिगत-कैफियत-वरवरचें, पक्कें नव्हे तें, कसें तरी तयार केलेलें; अंदाजी. कच्चा ताळा-ताळेबंद-कीर्द-जमाबंदी-बाब-हिशेब-बेरीज' इ॰, = अपुरा; बंद न केलेला, अपूर्ण. [ध्व. कच; हिं. कच्चा; तु॰ सं. कथ्थ = खोटें] ॰अमदानी- स्त्री. एकंदर जमा (खर्च वजा न करितां). ॰अंमल-पु. १ पगार घेऊन केलेली सरकारी (जिल्ह्याची, तालुक्याची) नोकरी, काम; याच्या उलट मक्त्याचा अंमल. कच्चा मोकद्दमा पहा. २ कच्चा अर्थ १७ पहा. ॰असामी-पु. हंगामी, उपरी शेतकरी-मालक; ज्याचा कबजा कायमचा नाहीं असा इसम. ॰आकार-पु. ठोकळ हिशेब, अंदाज; साधारण आढावा. ॰कागद-पु. खळ न लावलेला कागद. ॰करवड-पु. माशाचा एक प्रकार, याचा रस्सा करतात. -गृशि २.४७. ॰खर्च-पु. १ कच्चा हिशेब, टांचण. २ तात्पुरता, कायम नव्हे असा खर्च. 'कच्चे खर्चाचे तमाशे असतील त्यांच्या नाइकानें वेळीं आपले लोकास १० दिवस रजा द्यावी.' -(बडोदें,) कलावंत खातें २०. ३ जुजबी; ठोकळ खर्चाखेरीज खर्च; जो प्रसंगीं होईल तो सामान्य खर्च. ॰खर्डा-पु. १ अंदाज- पत्रक; बजेट (हिशेबाचें); पक्का करण्यापूर्वीचा पहिला खर्डा. २ कुळकर्ण्यानें शेतकर्‍यांकडून आलेल्या रक्कमांचा ठेवलेला हिशेब. ॰खाना-पु. पोळ्या, डाळभात, खिचडी इ॰ जिन्नस. -मसाप १.१०. ॰डांक, डाग-पु. शिसें, जस्त किंवा कथील यानीं दिलेला डांक (चांदीचा नव्हे); तात्पुरता जोड; कस्तर करणें. ॰ताप, ज्वर- पु. साधा ताप; विकोपाला न गेलेला ताप. ॰तोळा-पु. (क.) ९२ गुंजांचा तोळा (पक्का तोळा ९६ गुंजांचा असतो). ॰दोरा- धागा-पु. पटकन् तुटणारा दोरा; पीळ न घातलेला दोरा. ॰पक्का-वि. अंदाजी, ठोकळ आणि त्यावरून केलेला पक्का हे दोन्ही ज्यांत आहेत असा (जमाखर्च, वही, खतावणी इ॰). ॰पाडा- ढा-पु. ठोकळ, तोंडीं, त्रोटक, ठाकठीक न केलेली, कच्ची हकिगत, वर्तमान, साधन (क्रि॰ वाचणें). ॰बटवडा-पु. इसमवार पगारवाटणी (सरकारी नोकर किंवा मजूर यांना); डोईपगार. ॰भरणा-पु. रयतेनें भरलेला सारा, वसूल (ऐन किंवा नक्त). ॰मामला, मामलत-पु. कच्चा अंमल पहा. ॰माल-पु. ओबडधोबड; न कमावलेला; मूळच्या स्वरुपांतील; ज्याचा जिन्नस बनविला नाहीं अशी वस्तु (कापूस, कातडें, बी, वनस्पती इ॰). 'विलायती कारखान्यांत हिंदुस्थानांतून जो कच्चा माल जातो तो बंद झाला.' -के ३१.५.३०. ॰मोकद्दमा-पु. कामामध्यें नफातोटा होईल तो धन्याच्या वाट्याला अशा बोलीनें केलेलें काम, गुमास्तेगिरी; कच्चा अंमल. मक्त्याच्या उलट. ॰रंग-पु. १ धुतला असतां जाणारा, न टिकाऊ रंग; रंग पक्का करण्यासाठीं उकळावा लागतो, तो उकळला नसला म्हणजे त्यास कच्चा रंग म्हणतात. २ तिफाशी सोंगट्यांत काळा अथवा हिरवा रंग. ॰वसूल-पु. रयतेकडून आलेला सारा, खंड (ज्याची वर्गवारी काढली नाहीं असा). ॰शेर-पु. प्रमाणभूत (पक्क्या) शेरापेक्षां कमी असणारा शेर. (क.) १५ रुपये भारांचा शेर. (उलट पक्का ८० भारांचा). ॰कच्ची-स्त्री. (तिफाशी सोंगट्यांत) १ मेलेली पण पुन्हां नुकतीच जिवंत केलेली, नुकतीच बसविलेली सोंगटी; पट फिरून न आलेली सोंगटी. २ हिरवी किंवा काळी सोंगटी. तिफाशीं सोंगट्यांत तांबडा व पिंवळा यांस पक्का व हिरवा व काळा यांस कच्चा रंग अशा संज्ञा आहेत. ३ (ल.) फजिती; मानहानि; अपकीर्ति. ॰असामी-स्त्री. दिवाळें वाजलेला किंवा अपुरीं साधनें असलेला, नालायक सावकार, कंत्राटदार, कूळ, अर्जदार, खंडकरी इ॰. ॰कमाविशी-कमावीस-स्त्री. तैनात घेऊन केलेलें सारावसुलीचें काम; नफातोटा धन्याचा अशा बोलीनें मामलत वगैरे करावयाचा प्रकार; कच्चा अंमल (ह्याच्या उलट मक्त्याची कमाविशी). ॰कुंदी-स्त्री. कपडा भट्टींत न घालतां नुसता धुवून केलेली थंडी इस्त्री. २ धुतलेल्या कपड्यास खळ न लावतां केलेली इस्त्री. [कच्ची + कुंदी = खळ लावणें, इस्त्री करणें] ॰कैद- स्त्री. चौकशीपूर्वीची किंवा अपराध शाबीत होण्यापूर्वीची कैद. २ नजरकैद; साधी कैद. ॰कोंबी करणें-(क.) एखाद्याचें भजन करणें. ॰खोर-पु. सदोदित ज्याची फजिती किंवा पच्ची होते असा माणूस; फजीतखोर. ॰जमाबंदी-स्त्री. एकूण आलेली गांवची जमा (खर्च वेगळा काढून तो वजा न घालतां). ॰जप्ती-स्त्री. (कायदा) दाव्याचा निकाल लागण्यापूर्वी केलेली जप्ती; अवलजप्ती पहा. ॰बाजू-स्त्री. (सोंगट्यांचा खेळ) तिफाशी डावांत काळ्या व हिरव्या सोंगट्या. ॰बुटी-ट्टी-स्त्री. सोनेरी किंवा रुपेरी रंगानें कापडावर काढितात ती बूट, फुलें, खडी. -वि. अशा कापडाचें (पागोटें; अंगा- रखा इ॰); खडीदार. ॰माती-स्त्री. कोरडी, चिक्कणपणा नसणारी माती. ॰मामलत-कच्चा अंमल पहा. ॰मिती-स्त्री. मारवाडी, सावकार हे कर्जाऊ दिलेल्या रकमेची तारीख आदल्या दिव- शींची घालतात ती. याच्या उलट पक्की मिती (कुळाकडून आलेल्या रकमेची तारीख मात्र दुसर्‍या दिवशींची घालतात). ॰मुदत-स्त्री. (सावकारी) हुंडी हातांत पडल्यानंतर अमुक दिवसांतच ती वटविली पाहिजे अशा प्रकारची दिलेली मुदत; ह्याच्या उलट बंदीमुदत ( = हुंडींत दिलेल्या तारखेनंतरची जास्त मुदत). २ हुंडीची ठराविक मुदत भरण्यापूर्वीचा काल; अद्याप संपावयाचा मुदतीचा काल. ॰लढाई-स्त्री. पुरा निकाल न होतां झालेलें युद्ध; दोन्ही पक्षांनीं मध्येंच सोडून दिलेली लढाई; अनिर्णीत लढाई. ॰वहिवाट-स्त्री. कची वहिवाट पहा. ॰शाई-स्त्री. लाख न मिसळलेली, पाण्यानें निघून जाण्यासारखी शाई. ॰सुपारी-स्त्री. न शिजविलेली सुपारी; पोफळ; रोठा. ॰हुंडी-स्त्री. अद्याप न पटलेली किंवा न स्वीकार- लेली हुंडी. ॰कच्चें-वि. न पिकलेलें, व इतर अर्थी कच्चा पहा. ॰अंडें-न. नवीन घातलेलें अंडें; ताजें अंडें. ॰अक्षर-न. खराब व बिन कित्त्याचें अक्षर; वळण नसलेलें अक्षर. ॰इरसाल-न. जिल्ह्यांतून सरकारी खजिन्यांत पाठविलेला शेतसार्‍याचा भरणा. ॰कातडें-न. न कमावलेलें किंवा रंगविलेलें कातडें. ॰खोर-कच्ची- खोर पहा. ॰खातें-न. (हिशेब) ज्या खात्याचें येणें-देणें पुढील सालास उतरावें लागत नाहीं असें खातें; तात्पुरतें खातें. ॰गिरी- स्त्री. कच्चेपणा; अपूर्णता; अपक्वता. 'तुम्ही आधीं कच्चेगिरी केली म्हणून फसला.' ॰चीट-छीट-न. जें धुतलें असतां त्यावरील रंग नाहींसा होतो असें चीट. ॰दूध-१ न तापविलेलें, निरसें दूध. २ नवीन व्यालेल्या जनावराचें पहिल्या बारा दिवसांतील दूध; कोवळें दूध. ॰नाणें-न. चलनी नाण्यांत आलेला सरकारी वसूल (यांत निरनिराळीं नाणीं सरभेसळ आलीं असतात). ॰पान-न. पान- वेलीचें, विड्याचे हिरवें पान (याच्या उलट पक्कें, पिकलेलें पान). ॰पोतें-न. सरकारी चावडींत भरलेला शेतसारा; सरकारी खजि- न्यांत ज्या स्थितींत येतो त्या स्थितींतील वसुली पैसा. ॰बच्चें- न. (अव. कच्चींबच्चीं) मूलबाळ; पोरबाळ; लहान मूल. 'येक म्हणे गा पळोन जावें । तरि कच्चे बच्चे काय करावे ।' -दावि २३२. 'तो चार कच्च्याबच्च्यांचा धनी आहे.' [हिं. कचबच] ॰बारा-पु. (तिफाशी सोंगट्यांत) फांशांवरील एक दान; (एकावर पांच, एकावर सहा व एकावर एक अशा) बारा ठिपक्यांचे दान. ॰मडकें-१ न भाजलेलें मडकें. २ (ल.) अज्ञानी माणूस (मडकें = डोकें, बुद्धि). हें अजून कच्चें मडकें आहे.' -नाम ४. ॰रंग-पु. (तिफाशी सोंगट्यांत) हिरवा व काळा रंग. कच्ची बाजू पहा. ॰रेशीम-न. पाण्यांत न उकळलेलें रेशीम. ॰लोणी-न. कोर्‍या दुधापासून घुसळून काढलेलें लोणी ([दह्याचें नव्हे]) ॰वजन-न. (क.) (सोन्याचें) ९२ गुंजांचा तोळा. कच्चा तोळा पहा.

दाते शब्दकोश

अग्नि

पु. १ विस्तव; आग; अनल. २ पंचमहाभूतांतील एक देवता. ३ जठराग्नि; (ल.) भूक. ४ आग्नेयी दिशा व तिचा अधि- पति. ५ यज्ञीय देवता; गार्हपत्य, आहवनीय व दक्षिणाग्नि असे तीन त्रैताग्नि व सभ्य आणि आवसथ्य मिळून पंचाग्नि. ६ तीन संख्येचा वाचक. ७ चित्रकादि जठाराग्नि प्रदीप्त करणाऱ्या वनस्पती. [सं.]. ॰घेणें-दारूगोळ्याचा मार सहन करणें. ॰देणें-प्रेत जाळणें; उत्तरक्रिया करणें. ॰चा पाऊस पडणें-अग्निवर्षाव होणें; एकदम अनेक संकटें-जुलूम कोसळणें, गुदरणें. ॰आराधना- शत्रूंचीं गांवखेडीं, शेतें-भातें जाळणें. -ख २०९९. ॰कण-पु. विस्तवाची ठिणगी; स्फुल्लिंग; फुणगी. ॰कमळ-न.योगशास्त्रांतील एक संज्ञा. भुवयांच्यामध्यें अग्निनामक कमळ आहे तें विद्युद्वर्ण असून त्याला दोन पाकळ्या आहेत. तेथ 'हं' 'क्षं' हीं बीजचिन्हें आहेत. -बिउ १.५३. ॰कार्य-न. उपनयनानंतर बटूनें ब्रह्मचारी धर्माप्रमाणें करावयाचा होम; अग्नि-उपासना. ॰काष्ठ-न. निखारा; पेटलेलें लांकूड; विस्तव. ॰काष्ठ भक्षणें- १ अग्निप्रवेश करणें; अग्नींत उडी टाकून मरणें. 'अर्जुन म्हणे हेचि शपत । जरी मोडोनि पडेल सेत । तरी मी अग्निकाष्टें भक्षीन सत्य ।' -ह ३२.१६९. २ सती जाणें. 'आपला पति मृत झाल्याची खबर कानीं पडतांच तिनें अग्निकाष्ठें भक्षण करण्याचा निश्चय केला'. ॰काष्ठ अॅसिड- (पायरोलिग्निअस अॅसिड) हें लांकडांतून कच्च्या स्वरूपांत निघतें. -सेंपू २.४२. ॰कुंड-न. होमाच्या वेळीं अग्नि ठेवण्या- करितां केलेला खड्डा, पात्र; वेदी. ॰कुमार-पु. अजीर्ण, कॉलरा, वातजन्य रोग यांवरील पारा, गंधक, बचनाग टांकणखार वगैरेचें केलेलें औषध, रसायन. -योर १.५०२. ॰क्रीडा-स्त्री. दारुकाम; आतषबाजी; दारूगोळ्याचा भडिमार; फटाके, दारू उडविणें. ॰खांब-पु. तप्तलोहस्तंभ; शिक्षेचा एक प्राचीन प्रकार; नरक- यातनांपैकीं एक; यम लोकींची एक शिक्षा. 'तप्तभूमीवरी चाल- विती । अग्निखांबासहि कवळविती ।।'. ॰चक्र-न. १ षट्चक्रांपैकीं एक; अग्निकमळ पहा. -एभा १२.३३५. २ शकुन, फलज्योतिष यांतील एक संज्ञा; शांतिकर्मासाठीं अग्नि कोठें आहे हें पहावयाचें चक्र. शुक्ल प्रतिपदेपासून चालू तिथीपर्यंत मोजून त्या संख्येंत एक मिळवावा व रविवारापासून चालू वारापर्यंतची संख्या मिळवावी व त्या संख्येस ४ नी भागावें. बाकी शून्य किंवा तीन उरल्यास अग्नि पृथ्वीवर असून शुभ होय; २ उरल्यास अग्नि पाताळीं व १ उरल्यास अग्नि स्वर्गलोकीं होय; हे दोन्ही अग्नि शांतिकर्मास अशुभ होत -धसिं २८४. [सं.]. ॰ज खडक-पृथ्वीच्या पोटां- तील अग्नीनें आंतील पदार्थांचा रस होऊन त्यापासून बनणारा खडक; लाव्हा. -भू ७८. ॰ज्वाला-स्त्री. अग्निशिखा; ज्योत; जाळ. ॰तीर्थ-न. तीर्थ पहा. ॰दिव्य-न. दिव्य पहा. ॰नाश- पु. श्रोत स्मार्त अग्नि विझून जाणें; अग्निहोत्रांतील अग्नि नष्ट होणें; (याबद्दल प्रायश्चित घ्यावें लागतें). ॰नौका-स्त्री. आग- बोट; वाफर; स्टीमर. ॰पंचक-न. फलज्योतिषांतील एक योग; हा घातक असून त्यांत अग्नीपासून भय असतें. यासारखेंच चौरपं॰ ,मृत्युपं॰ ,राजपं॰ वगैरे योग आहेत. शुक्ल प्रतिपदेपासून चालू तिथीपर्यंत मोजून त्यामध्यें चालू लग्न मिळवून त्या संख्येस नवानीं भागून बाकी दोन राहिल्यास तें अग्निपंचक होय. हें सर्व गृहकर्मास वर्ज्य मानितात. -मुमा. [सं.]. ॰परीक्षा-स्त्री. अग्नि- दिव्य पहा. ॰पात्र-न. (शिंपी.) इस्त्री यंत्र; कपडा कडकडीत करण्याचें यंत्र; इस्तरी पहा. ॰पुट-न. रसायन, औषधें, मात्रा वगैरे करण्यास त्यांना अग्नीची आंच देऊन जो संस्कार करितात तें. ॰प्रद-वि.पाचक; अग्निवर्धक; अग्निदीपक. ॰प्रवेश-पु. १ स्वतःस जाळून घेणें. २ सती जाणें; अग्निकाष्ठ भक्षणें पहा. 'पुत्रवंत्या स्त्रिया विशेष । तिहिं न करावा अग्निप्रवेश ।।' ॰बाण-पु, दारूनें वर उडवावयाचा बाण; दारूचा बाण; अग्न्यस्त्र. ॰मणी-पु. एक काल्पनिक रत्न; सूर्यमणि; रविकांत. सूर्यकांत मणी पहा. ॰माद्य- न. अपचनाचा रोग; जठराग्नि प्रदीप्त नसणें; भूक न लागणें. ॰मापक-पु. न. अत्युष्णतामान मोजण्याचें यंत्र; पायरॉमीटर. ॰मुख-न. १ हिंग एक भाग, वेखंड २ भाग, पिंपळी ३ भाग, सुंठ ४ भाग, ओवा ५ भाग, हिरडेदळ ६ भाग, चित्रकमूळ ७ भाग व कोष्ठ ८ भाग यांचे चूर्ण. हें अग्निमांद्यावर देतात. -योर १. ४९३. २ देव. ३ ब्राह्मण. ॰यत्र-न. १ बंदूक; तोफ. 'यांच्या अग्नियंत्रशौंडत्वाची तारीफ व्हायला वेळेनुसार चुकायची नाहीं.' -नि ८०८. २ दारूकाम; आतषबाजी. 'भरूनी रजतमाचें औषध । करूनी अग्नियंत्र सन्नद्ध । कृष्णापुढें अतिविनोद । एक प्रबुद्ध दाविती ।।' -एरुस्व १५.११७. ॰रथ-पु. आगगाडी. ॰रोहिणी- स्त्री. काळपुळी पहा. ॰वर्ण-वि. अग्नीसाररखा तांबडा लाल (रंग); रक्तकांति. ॰वर्धक-वि. पाचक. ॰वर्धन-न. पचन; जठराग्नीचें उद्दीपन. ॰विच्छेद-पु. अग्निनाश; पत्नी मृत झाली असतां अथवा इतर कारणांनीं अग्निहोत्र बंद पडणें. (याबद्दल प्रायश्चित्त सांगितलें आहे). ॰वृद्धि-स्त्री. अग्निवर्धन; पचनशक्तीची वाढ; जठराग्नि प्रदीप्त होणें; आहाराचें प्रमाण वाढविणें. ॰शस्त्र-न. बंदूक, तोफ वगैंरे दारूनें उडणारें हत्यार. ॰शाला-स्त्री. अग्न्यागार; अग्निगृह; अग्नि ठेवण्याची जागा; यज्ञशाळा; होमशाळा. ॰शिखा-स्त्री. अग्नीची ज्वाळा; अग्निज्वाळा. ॰ष्टुत्-पु. (ख्रि) 'एंबर डेज' या इंग्रजी शब्दाचा पर्याय; राखेचे दिवस; ज्यांची दीक्षा होणार आहे त्यांच्यासाठीं प्रार्थना करण्याचे दिवस. 'उपोषणमंडळाशिवाय या चर्चच्या प्रार्थनासंग्रहांत अग्निष्टुत्, अनुनय व कित्येक विशिष्ट दिव- सांच्या पूर्वीं करावयाचीं प्रदोषोपोषणें...सांगितलीं आहेत'. -ना वा. टिळक. उ. मं. ३. [सं. अग्नि + स्तु.]. ॰ष्टोम-पु. सप्तसोमसंस्थां (यज्ञा) पैकीं एक; सोमयाग; यज्ञ. ॰ष्वात्त-पु. अव. पितृदेवता, ज्यांस मंत्राग्नि मिळालेला आहे असे; ज्यांनी जिवंतपणीं अग्निहोत्र पाळलें नाहीं असे; मरीचीपुत्रांपैकीं पितर; जिवंतपणीं श्रौताग्नि ज्यांनीं ठेवला नाहीं (अग्निष्टोमादि याग केले नाहींत) असे पितर (सायण). ॰सेवा-स्त्री. अग्नीची उपासना, पूजा. ॰स्थान-न. अग्निकमळ-चक्र पहा. 'आकळलेनी योगें । मध्यमा मध्यमार्गें । अग्निस्थानौनि निगे । ब्रह्मरंध्रा ।।' -ज्ञा ८.९४. ॰होत्र-न. १ श्रौता- ग्नीची उपासना; सकाळसायंकाळ अग्नीला होम देऊन अग्नि सतत राखण्याचें व्रत. २ (थट्टेनें) धूम्रपान; विडी ओढणें. ॰होत्री-पु. अग्निहोत्र पाळणारा; (थट्टा) तंबाकू ओढण्याचें व्यसन असणारा. ॰स्नान-न. (व.) एक तांब्याभर पाण्यांत स्नान करणें.

दाते शब्दकोश

आहार

पु. १ (व.ना.) निखारा; विस्तव; फोपाटा; 'चुलींतून आहार काढ व हातपाय शेक.' २ इस्त्री; कपडे कडक करणें; (क्रि. देणें.) [सं. आ + हृ]

दाते शब्दकोश

आहार      

पु.       १. निखारा; विस्तव; फोपाटा : ‘चुलींतून आहार काढ व हातपाय शेक.’ (व.) २. इस्त्री; कपडे कडक करणे. (क्रि. देणे)

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

अहार

पु. १ विस्तव; निखारा; फुंफाटा. २ इस्त्री करणें (क्रि॰ देणें). [म.आहार = विस्तव; का. होळकु-पु = तेज]

दाते शब्दकोश

गॉम

न. (गो.) गोंद; खळ. [पोर्तु.; इं. गम्] गॉमार करचें-क्रि. कपडे खळींत घालून इस्तरी करणें.

दाते शब्दकोश

गॉमार करचे      

कपडे खळीत घालून इस्त्री करणे. गॉमॉ      

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

कृतिशून्य

क्रियाहीन, पर्यकपंडित, कृतिहीन, स्वभावांतील नाकर्तेपण उघडे पडले, हळूबाई, केवळ बोलूकाका, वाचिवीर्य, आळशी, ऐतखाऊ, निरुद्योगी, सुस्त, काळकाढू, आरंभशूर, निष्क्रिय, त्याच्या हाताने ते होणार नाहीं, नुसते बोलणें तेवढे ऐकून घ्यावें! साडीची इस्त्री बिघडणार नाही किंवा चेहऱ्याची पावडर पुसून जाणार नाही अशा बेतानेच त्या धडाडीने कामाचे डोंगर उठवीत असतात ! आधीच उल्हास त्यांत फाल्गुन मास, न कर्त्यांचा वार शनिवार, बारीकसारीक अडचणींचा बाऊ करतात व पाय माघारी घेतात.

शब्दकौमुदी

कवा

क्रिवि. (कुण.) केव्हां. ' बाच्या वक्ताला इस्तरी राज कवा व्हत. ' -बाय २.३. [सं. कदा]

दाते शब्दकोश

फॅर्र

न. (गो.) इस्तरी. [पोर्तु. फेरा]

दाते शब्दकोश

सैन

न. एक जातीचें विलायती कापड. 'सैनाचा पांढरा शुभ्र व इस्त्री केलेला कडकडीत अंगरखा जाऊन त्याचे जागीं खादीचा अंगरखा आला.' -टीच १.९५.

दाते शब्दकोश

शेण

न. १ गाय, म्हैस, बैल वगैरेंची विष्टा, पुरीष. २ फळें, फुलें, पानें कुजून गोळा झालीं म्हणजे त्यांस म्हणतात. -स्त्री. १ शेणी; गोवरी; वाळलेला शेणाचा पोहो. २ (बे.) गुळाची ढेप. [सं. शकृत्; शकन्; तृ. शक्ना; प्रा. छाण; गु. छाण; सिं. छेणु; छेणो; सं. छगण-शगण-शअण-शाण- श्याण-शेण. -रा. ग्रंथमाला] म्ह॰ पडलेलें शेण माती घेऊन उठतें. शेण खाणें-मूर्खपणाचें, निष्फळ, भलतेंच कृत्य करणें. केळें खाणें पहा. 'मग शेण खायला मला कशाला आणलें?' -नामना २१. शेणाचा दिवा लावणें-दिवाळें काढणें. शेणईं-पु. शेणवी पहा. शेणकई, शेणकाई, शेणकी, शेणख(खा)ई-स्त्री. १ शेण टाकण्याकरितां केलेली खांच, खड्डा; उकिरडा. २ (देशावर) शेणाची रास, ढीग शेणकला- काला-पु शेणखळा पहा. ॰कुंडा-पु. (राजा.) घरधंदा; घरकाम; रोजचें व्यवहारांतील शेणगोठा करणें, झाडणें, सारवणें, दळणें, कांडणें वगैरे काम. ॰कूट-कूर-न. १ गोवरीचा तुकडा; शेणीचा तुकडा. २ वाळलेल्या शेणाचे तुकडे, चुरा वगैरे; गोवर. ॰कूर-न. शेणगोठा पहा. ॰कोंडा-पु. शेणांत भाताचें तूस किंवा कोंडा घालून लावलेल्या गोंवऱ्या. ॰खंड-खुंड-न. शेणकूट; गोवरी; गोवर. ॰खळा-पु. १ सारविण्याकरितां पाणी घालून कालविलेलें शेण. २ फळें, पानें, फुलें कुजून, नासून जो गोळा होतो तो. ॰खळी-खाई-स्त्री. शेणकई पहा. ॰खुंड-न. १ गोवरीचें खांड; गोवर. -पु. २ (ल.) (निंदार्थीं) शेणवी. ॰गंड-पु. (निंदार्थी) शेणवी. ॰गाईर-स्त्री. (राजा.) शेण- कई. ॰गोटा-पु. १ शेण (सामान्यतः). २ शेणानें सारवणें, झाडलोट वगैरे कामांस योजावयाचा सामान्य शब्द. यासारखेच शेणशेणकूर, सडासंमार्जन, सडासारवण, वारासार, झाडलोट, चूलपोतेरें, शेणपोतेरें, शेणपाणी, शेणसडा इत्यादि शब्द व्यापक अर्थानें योजिले जातात. ॰गोठा-पु. गुरांच्या गोठ्या- संबंधीं सामान्य कामांचा दिग्दर्शक शब्द; शेण काढणें, झाडणें, गोठा साफ करणें इत्यादि कामें; गोठापाणी. ॰गोळा-पु. १ खरकट्यावर लावण्याकरितां किंवा इतर कामांकरितां घेतलेला शेणाचा गोळा; शेणाचा लगदा. शेणगोळे घालणें-अव्यव- स्थितपणें केलेलें काम तपासून दुरुस्त करणें. शेणणें-अक्रि. १ शेंण टाकणें; हगणें; लेंडी टाकणें. २ डोळ्यांस पू येणें; चिपडें येणें ॰थापणारा-पु. आळशी, निरुपयोगी, रिकामटेकडा मनुष्य; नाकर्ता, नपूंसक मनुष्य; षंढ. ॰दिवा-पु. दिवाळें काढल्याची खूण म्हणून लावावयाचा शेणाचा दिवा. 'दिवाळ खोरीचा शेणदिवाच लावणें होय.' -के २०.९.३०. शेणप- पु (कों.) शेणकला, शेणखळा पहा. शेणपा-पोह-पोहो- पोव, शेणाचा पोहो-पु. १ शेणाची गोळा, लगदा; पोहो; एका वेळीं जनावरानें केलेली विष्टा. २ (ल.) लठ्ठ परंतु दुर्बल, जड, मद्दड जनावर; दुर्बल, नाकर्ता, नालायक मनुष्य; षंढ; नपूंसक. ॰पाटी-स्त्री. शेण वाहून नेण्याची टोपली. ॰पाणी- न. १ शेणखळा; पाण्यांत कालविलेलें शेण. २ शेणगोटा, सडा- संमार्जन वगैरे घरगुती कामासंबंधीं व्यापक अर्थानें योजावयाचा शब्दच गोठापाणी. ॰पुजा-स्त्री. शेणमार पहा. ॰पुंजा-पु. १ शेणगोळा करणारा इसम. २ शेणगोळ्यासारखा मनुष्य; हलक्या दर्जाचा मनुष्य; नीच, हलकट मनुष्य. ॰पुंजी-स्त्री. गोंवऱ्या लावणारी स्त्री; हलकट, नीच स्त्री. ॰पुडी-स्त्री. वाळलेल्या शेणाचे तुकडे, चूर; गोवर. ॰पोतेरें-न. शेणखळ्याच्या बोळ्यानें जमीन सारवणें. (क्रि॰ करणें). ॰भोंवर-पु. शेणकिडा; शेणा- वरील माशी; शेणावरील भुंगा. [सं. शेण + भ्रमर] ॰माती-स्त्री. (ना.) धुळवड. ॰मार-पु. एखाद्याची अप्रतिष्ठा व्हावी म्हणून त्यावर केलेला शेण, चिखल इत्यादिकांचा मारा. शेणवड-स्त्री. (कों.) १ धुळवड; शेण, माती वगैरे फेंकणें, मारणें. २ धुळव- डीच्या दिवशीं एकमेकांवर फेंकण्याकरितां केलेली शेण, माती वगैरेची राड, गारा. शेणवडणें-अक्रि. शेणवड करणें. शेण- वणी-न. शेण कालविलेलें पाणी. शेणविरणें-अक्रि. राब कर- ण्यासाठीं शेतांत शेण पसरणें. ॰सडा-पु. १ पाण्यांत शेण काल- वून तें जमिनीवर शिंपणें, उडविणें. (क्रि॰ टाकणें). २ फळें, फुलें, पानें कुजून त्यांचा झालेला गोळा; शेणखळा. ३ गर्दीमध्यें माणसांवर उडविलेलीं फुलें, पैसे, कवड्या वगैरे जमीनीवर पडून पसरलेलीं दिसतात तो. ४ लढाईतमध्यें भयंकर कत्तल झाल्या- मुळें जमीनीवर सांडलेला रक्ताचा स्त्राव, मांसाचे छिन्नभिन्न तुकडे वगैरे.' त्या अडचणींत पांचशें मनुष्यें ठार झालीं, तैशीच घोडींहि पडलीं, तैसेच जखमीहि झाले, केवळ शेणसडा होऊन गेला.' -भाब ७९. 'केला शेणसडा त्याच्या फौजेचा ।' -गापो ३. ॰साऊळ-स्त्री. पोफळीची अळी खणून तिच्या मुळाशीं शेण घालतात तें. ॰सूप-न. शेण भरून टाकण्याचें सूप, शिपतर. शेणाडी-स्त्री. शेणकई. शेणामेणाचा-वि. दुर्बल; निःसत्त्व; अशक्त; हलका; पोकळ; वरपांगी; लिबलिबीत; मऊ, सोपा वगैरे (इमारत, वस्तु, धंदा, प्राणी, मनुष्य यांच्या बाबतींत.) तिरस्कार, उपेक्षा दाखविण्याकरितां योजतात. 'दिवसेंदिवस शेणामेणाचे ते लेखंडाचे होत चालले.' -भाब ५९. शेणामेणा लोखंडाचा-वि. प्रथम फारच दुर्बल, शिथिल परंतु नंतर कांहींसा दृढ, त्यानंतर फारच दृढ असा (व्यवहार, भाषण वगैरे). शेणार काढप-(गो.) जमीनदोस्त करणें; नुकसान करणें. शेणारा-पु. गोंवऱ्यांचा लिंपलेला ढीग, रास. शेणी-स्त्री. १ गोवरी; थाबडा; शेणाचा वाळविलेला गोळा. २ शेणाचे वाळलेले पोहो (अव.) 'नामयाची जनी सवें वेची शेणी ।' -तुगा ३६९१. ३ अग्निहोत्र्यानें होमा- करितां शेणाचे वाळविलेले गोळें. ४ (राजा.) (सांकेतिक) दुंडा पैसा; ढबू पैसा. (वर)शेणी रचणें-जाळणें; नाहींसें करणें 'लोकलाजेवरी रचिल्या शेणी ।' -मध्व २२८. ॰पाणी- न. सडा घालणें, शेण्या घालणें, पाणी आणणें वगैरे काम. (क्रि॰ करणें) शेण्या-पु. शेणाचा पोहो. -वि. डोळे आले असतां कमी खुपतो पण पू बाहेर येतो त्या विकारास म्हणतात. शेण्या खैर-पु. खैर झाडाची एक जात. शेण्या- साप-पु. एक काळा विषारी साप.

दाते शब्दकोश

सकराई

स्त्री. हुंडी स्वीकारण्याबद्दल द्यावें लागणारें व्याज किंवा बट्टा. [सं. स्वीकार] सकरा(क्रा)ई नकरा(क्रा)ई-स्त्री. हुंडी खडी राहिल्यास त्याबद्दल नुकसानभरपाईदाखल हुंडी लिहीणारापासून घेतला जाणारा पैका. हा शेंकड्यावर आकारला जातो.

दाते शब्दकोश

सरबरा

ई-स्त्री. व्यवस्था; तरतूद, बंदोबस्त; पाहुणचार; (धंदा वगैरे) चालू करणें, गरजांची भागवणूक; व्यवस्था लावणें; निगा राखणें; आवरणें; चालविणें. सरभरा पहा. 'जें काम सांगाल त्याची सरबरा करूं' -रा ६.५६४. [फा. सरबराह् = सामुग्री; प्रवासखर्च]

दाते शब्दकोश

स्वस्त-स्ता

वि. सवंग, महाग नसलेला. [हिं.] स्वस्ता (स्था)ईस्त्री. सवंगपणा. स्वस्तावणें-अक्रि. सवंग होणें.

दाते शब्दकोश

वेडेपणा

जीर्ण चिंध्यांच्या गोधडीवर इस्त्री करण्याचा वेडेपणा कोण करील ? उंबराला जायफळ कां नाहीं हें विचारण्यासारखें.

शब्दकौमुदी

वजा

स्त्री. वर्जन; वजाबाकी; उणें करणें. -वि. उणा केलेला; कमती; कमी; काढून टाकलेला, घेतलेला. [अर. वझ्आ] ॰करणें-कमी करणें; काढून टाकणें. 'नोकरीवरून लोक वजा केले.' ॰ई-स्त्री. १ वजा घातलेली, सूट दिलेली रक्कम. २ खालीं आणणें; बढतीच्या उलट. 'रिसाल्यासंबंधानें बहाली, बडतर्फी, तरकी किंवा वजाई करण्याचा पूर्ण हक्क तुम्हांकडे राहील.' -रा ७.१५. ३ न्यून; उणीव. ॰बाकी-स्त्री. १ (गणित) मोठ्या संख्येंतून लहान संख्या कमी करुन बाकी काढण्याचा व्यापार. २ वर्जन; वजा करणें. ३ हिशेबाची शिल्लक बाकी. (क्रि॰ करणें). ४ वजा करून आलेलें उत्तर. [अर. वझ्आ + बाकी] ॰बाकी बेरीज-स्त्री. वजाबाकी आणि बेरीज. एकदम एकाच उदाहरणांत हे दोन्ही गणिताचे प्रकार शिकविणें. ॰वाट-स्त्री. १ देणेंघेणें चुकतें करून, बाकी काढून हिशेबाचा केलेला उलगडा; हिशेबाचा वांधा मिटविणें. २ उधळपट्टी. (व.) वजावाटोळें. ३ एकंदर रकमेंतून विशिष्ट रक्कम वजा घालून काढलेली बाकी. ॰शिरस्ताबाद-पु. शिवाजीच्या काळीं जमाबंदींत दर बिघ्यास ३ पांड जमीन वजा टाकण्याची असलेली पद्धत. ॰सूट-स्त्री. वजनामापांत विशिष्ट प्रमाणांत दिलेली सूट.

दाते शब्दकोश

दिल-ल्

पुन. हृदय; अंतःकरण; मन. [फा. दिल्] (वाप्र.) ॰फांकणें-फांकटणें-अस्वस्थ होणें; बेचैन होणें; गोंधळून जाणें. म्ह॰ दिलमे चंगा तो काथवटमें गंगा = अंतःकरण शुद्ध, पवित्र असल्यास पवित्र गंगा आपणाजवळ असल्याप्रमाणेंच होय. सामाशब्द- ॰आरामी-स्त्री. आनंद; खुशाली; मनाचा संतोष; शांतवन. 'तुम्ही आपली खुशालखबर लिहून दिल् आरामी करीत जाणें.' -रा २२.६५. ॰कुल-वि. हिरमुसलेला; कष्टी; श्रमी; लज्जित. 'दिलकुल बसले जिकडील तिकडे सन्मुख एकहि येईना ।' -पला ८५. दिल्खाक्रिवि. मनाप्रमाणें; यथास्थित. 'तुम्ही व राव पंतप्रधान खातर्जमेनें दिल्खा तदारूक अमलांत आणावा.' -दिमरा १.७. [फा. दिल्खाह्] ॰खुलास-सा- पु. शुद्धभाव; मनाचा मोकळेपणा; समाधान. 'दिल्खुलाशानें जाब दिला नाहीं.' -सभासद ३९. [अर. खिलास् = शुद्धता] ॰खुशी-स्त्री. १ आनंद; संतोष; तृप्ति; चित्ताची प्रसन्नता. २ रुकार; संमति; इच्छा; आपखुशी; पसंती. [फा. खुशी] ॰गर्मी- स्त्री. प्रेम, प्रीति; लोभ. 'दिल्गर्मी करून..कुशल वर्तमान पुसिलें.' -पदमव ७८. ॰गिरी-वि. दुःख, खेद; खिन्नता; बेदिली. ॰गीर-वि. दुःखी; कष्टी; खिन्न; असंतुष्ट; गांजलेला. ॰जम(मा)ई-स्त्री. खातरजमा; चित्तशुद्धता; मनाची मिळणी; मैत्री. 'भाऊची मार्फत महादजी शिन्देची दिल्जमाई केली.' -पदमव ७७. ॰जमीयत-स्त्री. समाधान; खातरजमा; निःसंदेहता; निःसंशयता. 'तर मोहिबीं दिल्जमीयतीनें आपले कदीम ठिका- णास यावयाचें..केलें पाहिजे.' -रा ३.९१. [अर. जमीयत्] ॰जोई-स्त्री. सांत्वन; समाधान. 'तुम्ही आमचे तर्फेनें यांची तशफ्फी व दिल्जोई करावी.' -रा २२.२५. [फा. दिल्जोई] ॰ताजगी-स्त्री. चित्तसंतोष; अंतःकरण आनंदविणें; मन प्रसन्न करणें. 'आपली खैरखुशी कलमी करुन दिलताजगी करीत असलें पाहिजे.' -रा १०.१६५. ॰ताजा-वि. नवीन, ताजें प्रेम अस- णारा; नूतन प्रेमसंपादन केलेला; प्रेमाची नव्हाळी व भर असलेला. ॰दप्त(फ्त)र-न. स्मृतिपट; आठवणींचं हृदयरूपी संचयस्थान. ॰दर्या-वि. उदारधी; गंभीर (मन). 'दिल्पाक दिल्दर्या इलाही मेहेर्बान खान.' -ब्रप ३०७. [फा.] ॰दार-वि. उदार; मन- मिळाऊ; सहृदय; मोठ्या मनाचा. [फा.] ॰दारी-स्त्री. १ उदा- रता; धीटपणा; खंबीरपणा; सह्रदयता; धीर. २ उत्तेजन; खातर- जमा. 'संचणीचा वख्त आहे तक्वा-दिल्दारी पाठविणें.' -रा १६.३३. 'मावळे लोक तमाम याची दिल्दारी करुन.' -वाडशाछ १.११६. ॰दिलासा-पु. धैर्य; उत्तेजन; भरंवसा; उत्साह; आश्वासन. (क्रि॰ देणें). 'दिलदिलासा देतें मी सखया फारच सुख मानी.' -पला ४.१२. ॰देही-स्त्री. उत्कटता. 'कित्येक सरदार कामकाजाविषयीं दिलदेही करीत नाहींत.' -रा ५. १५७. [फा. दिल् दिही] ॰न(नि)शीन-वि. १ पसंत. २ अव- गत; श्रुत. 'अजराह यगानगत दिल्निशीन जालें तें कलमी केलें असें.' -पया ४६३. [फा. दिल्निशीन्] ॰पाक-वि. पवित्र; शुद्ध अंतःकरणाचा; कपटरहित; सरळ; निष्पाप. ब्रप ३०७. ॰पाकी-खी-स्त्री. अंतःकरणाची शुद्धता; सरळता; निखालसता; निष्कपटता. 'आम्ही दिलपाखीनें मशाकत करुन...' -इमं ११. ॰भ(ब-व)र-पु. प्रियकर; दयित; वल्लभ. 'सुंदरा म्हणे दिलभरा राजआंबीरा हासून मसी बोला जी ।' -होला १६९. 'आगे सखे लोभ करावा, दिलभर पलंगी असावा.' -सला १.४९. -क्रिवि. मनाची तृप्ति होईपर्यंत. ॰भर(रं)वसा-भरोसा-पु. धीर; खातरी; उत्तेजन. ॰भरी-स्त्री. समाधान; खात्री; उत्तेजन. 'तमाम रयतेची दिलभरी करुन लावणी होय तें करणें.' -रा १.३४६. सफाई-साफी-स्त्री.मनाची निखालसता, निःशंकता. 'पुन्हां दिलसाफीचा फर्मान उभयतांनीं बादशहापासून संपादन केला.' -प्रामस ३२. ॰हवाल-वि. अस्वस्थ; त्रस्त मनाचा; मनामध्यें विवंचना असलेला. ॰हवाली-स्त्री. मनाची अस्वस्थता; विवं- चना, काळजी.

दाते शब्दकोश

लाशा

वि. १ लास (डाग) दिल्यासारखें चिन्ह ज्या आम्रादि फलावर असतें तो. २ लासाचे चिन्हानें युक्त असा (मनुष्यादि); डागलेला. [लास] लांशें-न. काळा डाग. [लास] लास-पु. १ वायुविकृति किंवा अन्य रोग इ॰ च्या निरसनार्थ त्वचा तापलेल्या लोखंडानें भाजणें; डागणी. (क्रि॰ देणें, घेणें). 'अज्ञानाचें लांशें । जेथ लागलेंचि न दीसे ।' -भाए ५८९. २ अशी त्वचा भाजून पडलेला डाग किंवा वण. ३ जन्मा- पासून माणसाच्या तोंड इ॰वर जो तांबडा, काळा, पिवळा इ॰ रंगाचा डाग असतो तो; तीळ; वांग. ४ आंबा इ॰ फळ अंशतः सडल्याचा जो डाग सालीवर उत्पन्न होतो तो. -न. अंगावरील केसाळ तीळ (मागील जन्माची खूण समजतात) [सं. लाछ्, लांछन] लासणी-स्त्री. १ तापलेल्या लोखंडानें दिलेली डागणी. (क्रि॰ करणें). २ (विणकाम) शाई, कोळसा इ॰ नीं विणा- वयाच्या वस्त्राच्या ताण्यावर केलेली खूण; लासन. [लास] लासणें-सक्रि. १ विस्तवांत घालून लाल केलेल्या लोखंडाचा डाग देणें; भाजणें. २ कोणत्याहि कारणासाठीं (त्वचा किंवा पृष्टभाग) भाजून, डागून खूण करणें. ३ पाजणीनंतर (ताण्याला) लासें लावणें, खुणा करणें. ४ भाजणें; जाळणें. 'मूर्खा, दीपा पंता/?/ स्वमनिं जऱ्हि म्हणे 'हें खरें फूल' लासी ।' -मोकृष्ण ५३.३९. -दा ३.७.२५. -दा १०.१०.६१. -अक्रि. १ जळणें. 'कपडा लासेल ! जरा इस्त्री थंड कर.' २ बिघडणें; डागळणें (फळ इ॰). लांसरूं-नपु. केंसाळ तीळ; वांग; लांस. लासें-न. १ डाग; वण. लास पहा. 'परी गुणत्रय वशें । त्रिविधपणाचें लासें । श्रद्धे जें उठिलें असें । तें वोळख तूं ।' -ज्ञा १७.७३. २ (विणकाम) लास; लासणी पहा. (क्रि॰ लावणें).

दाते शब्दकोश

कडक      

वि.       (मारताना कड असा होणारा आवाज, यावरून). १. टणक (लाकूड, माती); कमी चिकण. २. महाग (भाव, दर) : ‘विलायती हुंडीचा भाव घसरल्यामुळे सरकार कृत्रिम उपायांनीं नाणेंबाजार कडक राखून ठेवतें.’ – के १०·६·३०. ३. शिस्तीचा, तापट : ‘आपले वडील मोठे कडक आहेत.’ – विवि १०·५. ४. मोडता न येण्यासारखा, पाळलाच पाहिजे असा (नियम, शिस्त इ.). ५. (ल.) कठोर, उग्र, रागीट : ‘त्यांची मुद्रा बरीच कडक दिसत आहे.’– विवि ८·१·५. ६. जलाल; प्रखर (भाषण, लेख, ऊन इ.) : ‘उष्णकटिबंधात एखादे वेळेस उन्हाळा कडक होऊन सर्व पदार्थांचा सत्यानाश होऊन जातो.’ – पाव्ह ५५. ७. तेजस्वी, पाणीदार : ‘कृष्ण पुरःसर पांडव आले हांकीत ह्या कडक डोहा ।’– मोगदा १·१९. ८. वाळलेले, आर्द्रता नाहीशी झालेले (धान्य, भाकरी). ९. सणसणीत, जोराचा. १०. टणक पण ठिसूळ (लोखंड, सोने किंवा शिसे यांच्याशी तुलना करताना). ११. जहाल; झोंबणारे, उष्ण (तिखट); सहन न होणारे.१२. कच्चेपणामुळे दडस (फळ, भाजी). १३. दणकट, निकोप (माणूस, जनावर). १४. (ल.) कडू, तीव्र (औषध, तपकीर, विडी). १५. तीक्ष्ण, बोचणारे (थंडी). १६. कर्कश, कानठळ्या बसणारा (आवाज, संभाषण). १७. खळ घालून इस्त्री केलेला : ‘कुणी लोकल मुलगा कडक पॅन्टीत आला.’ – कोसला ४०. (वा.) कडक विझणे – मोठा आवाज शांत होणे.

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

पक्का

वि. (शब्दशः व ल.). कच्च्याच्या उलट. १ पिकलेला; प्रगल्भ; पूर्णावस्थेस आलेला. २ शिजविलेला; सिद्ध झालेला, ३ तयार असलेला; निश्चित; नक्की झालेला (बेत, मस- लत इ॰). ४ भाजलेलें (मडकें, वीट इ॰) ५ पुष्कळ दिवस टिकणारा (रंग). ६ तरबेज; हुशार; निष्णात; पूर्ण; श्रेष्ठ (मनुष्य वस्तु इ॰). जसें-'पक्का-कारकून-पंडित-चोर इ॰' ७ पूर्ण केलेलें; तयार केलेलें; गणित करून काढलेलें (त्रेराशिकांतील उत्तराचें चवथें पद. कच्चा पहा). पक्का शब्दाचे निरनिराळ्या शब्दांशीं संयोग होतांना निरनिराळे अर्थ होतात. पक्का धोंडा = अतिशय कठिण धोंडा. पक्का = पैसा = ढबू. पक्का कोस = सबंध, पुरा कोस. पक्कें दूध = तापविलेलें दूध. पक्कें तूप = फार कढविलेलें तूप. पक्कें रेशीम = उकळून तयार केलेलें रेशीम; पक्की शाई = शिजविलेली, फिकी न पडणारी, पुसून न जाणारी शाई. पक्का डाक = सोनें, चांदी, पितळ यांनीं दिलेला डाक, कस्तूर; याच्याउलट कच्चा = कथलाचा डाक. [सं. पक्व] ॰कच्चा-वि. (पक्का आणि कच्चा) अर्धवट पिकलेला, शिजलेला, तयार, लिहलेला, पुरा केलेला (अन्न, पिक, जमाखर्च, रंग इ॰). ॰खरडा-खर्डा-हिसाब-पु. रोजखर्ड्यावरून तयार केलेला हिशोब; कच्च्या टांचणावरून कायमच्या चोपडींत मांडलेला हिशोब; पक्की कीर्द. ॰ख्याल-पु. (संगीत) ख्यालामधील एक प्रकार. ॰तोळा-पु. ९६ (भार) गुंजांचा तोळा (कच्चा तोळा = एक रुपयाभार = ९० गुंजा). ॰रंग-पु. (तिफाशी सोंगट्यांचा खेळ) (दोन बाजूंस दोन दोन रंग वांटून घेतात त्यांतील) एका बाजूच्या तांबड्या व एका बाजूच्या पिवळ्या रंगाच्या सोंगट्या. काळ्या आणि हिरव्या रंगाच्या सोंगट्यांनां कच्चे रंग म्हणतात. शेर-पु. ८०तोळ्यांचा (भार) शेर. पक्की कुंदी-स्त्री. खळ वगैरे लावून कपडे स्वच्छ धुणें व कडक इस्तरी करणें. याच्या उलट कच्चीकुंदी. ॰जप्ती-स्त्री. (कायदा) फैसला, निकाल झाल्यानंतरची जप्ती. याच्या उलट कच्ची, अवल जप्ती, ॰मुदत- स्त्री. बंदी मुदत पहा; संपलेली, भरून गेलेली मुदत (हुंडी इ॰ची). पक्कें खातें-न. (जमाखर्च) ज्या खात्याचें देणें-येणें पुढील सालास उतरावें लागलें तें खातें.

दाते शब्दकोश