मराठी कोशवाङ्मय आणि माहिती तंत्रज्ञान
मराठीतला पहिला शब्दकोश ख्रिस्ती मिशनरी विल्यम कॅरे यांनी सेरामपोर (श्रीरामपूर) येथे १८१० साली प्रकाशित केला. त्यानंतर जगन्नाथशास्त्री क्रमवंत आणि त्यांचे सहा सहकारी, जेम्स थॉमस मोल्सवर्थ, थॉमस कँडी, य० रा० दाते, चिं० ग० कर्वे, इ० अनेकांनी मराठी शब्दकोशांना समृद्ध केलं आहे. याव्यतिरिक्त मर्यादित व्याप्ती असलेले किंवा विशिष्ट विषयांना वाहिलेले अनेक कोश तयार झाले. काही उदाहरणं :
- एका विशिष्ट ग्रंथातल्या शब्दांचा कोश (उदा० रा० ना० वेलिंगकर यांचा ज्ञानेश्वरीचा कोश)
- विशिष्ट कालखंडातल्या मराठी भाषेचा कोश (उदा० शं० गो० तुळपुळे - ॲन फेल्डहाऊस यांचा प्राचीन मराठीचा कोश)
- इतर भाषांतील शब्दांचे मराठीत अर्थ दिलेला कोश (उदा० माधव त्रिंबक पटवर्धन यांचा फार्सी-मराठी कोश)
- शासनव्यवहारासाठीचे विविध परिभाषा आणि पदनाम कोश.
गेल्या दोन दशकांतल्या इंटरनेट आणि माहिती तंत्रज्ञानाच्या प्रगतीमुळे शब्दकोशांकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलून गेला आहे. या बदललेल्या तंत्रज्ञानाचा आधार घेऊन मराठी कोशवाङ्मयाला आणखी समृद्ध करण्याची संधी आपल्यापुढे आहे. 'बृहद्कोश' प्रकल्प हे त्या दिशेने टाकलेलं एक पाऊल आहे.
‘बृहद्कोश’ काय आहे, आणि काय नाही
मराठीतलं हे समृद्ध कोशवाङ्मय विविध छापील ग्रंथांत विखुरलेलं आहे. कोशांचं काही प्रमाणात संगणकीकरण झालेलं असलं तरी हे सर्व कोश वेगवेगळ्या वेबसाईट्सवर वेगवेगळ्या संस्थांनी उपलब्ध करून दिलेले आहेत.
याचा तोटा असा, की एखाद्या शब्दाचा अर्थ पाहायचा असेल तर हे वेगवेगळे कोश तपासून पाहावे लागतात. एकाच क्लिकमध्ये, एकाच ठिकाणी हे कोश उपलब्ध नाहीत. एकाच शब्दाचा विविध कोशांतला अर्थ एकाच वेळी पाहता येत नाही.
तर, ही अडचण दूर करणे हे 'बृहद्कोश' प्रकल्पाचं मुख्य उद्दिष्ट आहे.
'बृहद्कोश' हा नवा शब्दकोश नाही. बृहद्कोश हे अनेक कोशांचं संकलन आहे.
प्रकल्पाचं नाव आणि बीजवाक्य
बृहद्कोश = बृहत् + कोश, म्हणजे 'मोठा, विशाल असा (एकत्रित) कोश'.
'मी तंव हमाल भारवाही' हे तुकाराममहाराजांच्या अभंगातून घेतलं आहे. वर सांगितल्याप्रमाणे 'बृहद्कोश' प्रकल्पाचं मुख्य उद्दिष्ट हे सर्व कोशवाङ्मय एके ठिकाणी, 'शोधता' येईल अशा पद्धतीने (searchable) उपलब्ध करून देणं हे आहे. 'बृहद्कोश' प्रकल्पाची भूमिका भारवाहकाची आहे, याची कायम आठवण राहावी म्हणून हे बीजवाक्य निवडलं आहे.
मूळ अभंगातल्या इतर ओळीही 'बृहद्कोश' प्रकल्पाला लागू पडतात. संपूर्ण अभंग खालीलप्रमाणे :
सकळिकांच्या पायीं माझी विनवणीं । मस्तक चरणीं ठेवीतसें ॥
अहो श्रोते वक्ते सकळ ही जन । बरे पारखून बांधा गांठी ॥
फोडिले भांडार धन्याचा हा माल । मी तंव हमाल भारवाही ॥
तुका ह्मणे चाली जाली चहूं देशी । उतरला कसीं खरा माल ॥
'बृहद्कोश' प्रकल्पाचे पथदर्शी नियम आणि संकेत
- सदरील कोशांचे संकलन कोणत्याही व्यावसायिक प्रयोजनासाठी उपलब्ध करण्यात आलेले नाही. त्याचा उपयोग केवळ शैक्षणिक / संशोधनपर उपक्रमात होणे अपेक्षित आहे. प्रकल्प संचालकांचा ह्यातील बौद्धिक संपदेवर कोणताही दावा नाही. प्रताधिकार कायद्याचे उल्लंघन करण्याचा कोणताही हेतू नाही, आणि मूळ कोशकारास श्रेय देण्यात आलेले आहेच.
- हा कोश सर्वकाळ मुक्त आणि विनामूल्य उपलब्ध राहील. कोणताही व्यावसायिक लाभ (उत्पन्न अथवा नफा) मिळविण्यासाठी सदरील उपक्रम चालविलेला नाही.
- 'बृहद्कोश' प्रकल्पासाठी वापरण्यात येणारी आयुधं (tools) शक्यतोवर मुक्तस्रोत (open source) आहेत आणि असावी.
- 'बृहद्कोश' प्रकल्प हा कधीच पूर्ण होणार नाही. भाषा अथांग आणि प्रवाही असते, आणि भाषेचा अर्थ लावणे ही सतत घडणारी प्रक्रिया आहे.
- याचा अर्थ असा, की नवनव्या कोशांची भर शब्दसंग्रहात घालणे हे 'बृहद्कोश' प्रकल्पाचं प्रमुख उद्दिष्ट आहे.
- कोणाच्याही प्रताधिकाराचं किंवा बौद्धिक संपदेचं उल्लंघन करणे, किंवा श्रमांचा अवमान करणे हा 'बृहद्कोश' प्रकल्पाचा हेतू नाही.
- 'बृहद्कोश' प्रकल्प Attribution-NonCommercial-NoDerivs 2.0 Generic (CC BY-NC-ND 2.0) प्रकारच्या अटींचे पालन करेल. अधिक माहिती इथे : https://creativecommons.org/licenses/by-nc-nd/2.0/
- प्रत्येक कोशाचा आणि कोशकाराचा योग्य प्रकारे उल्लेख केलेला आहे.
- प्रताधिकारधारकाने एखादा कोश 'बृहद्कोश' प्रकल्पात समाविष्ट करू नये अशी विनंती केल्यास त्याची अंमलबजावणी त्वरित केली जाईल.
- प्रकल्पात योगदान देणाऱ्या प्रत्येकाचा उल्लेख केला जाईल.
- प्रकाशित कोशसंपदेव्यतिरिक्त नवे शब्द तज्ज्ञ भाषाअभ्यासकांच्या शिफारसीने 'बृहद्कोश' प्रकल्पात समाविष्ट केले जातील.
- 'बृहद्कोश' वापरण्यासाठी सोपा असावा.
- 'बृहद्कोशा'चा आराखडा आणि दृश्यरूप किमानलक्ष्यी (minimalist) असावं.
प्रकल्प व्यवस्थापक
- आदूबाळ
- प्रसाद शिरगावकर
- ऋषिकेश खोपटीकर